Sunday, November 1, 2015

सुधागड, ता. सुधागड, जि. रायगड

संभाजी राजांविरुद्ध म्हणजेच स्वराज्याविरुद्ध झालेली कारस्थाने, त्या बावळटांनी औरंगजेबाशी बंड करुन संभाजी राजांशी मैत्री करण्यासाठी आलेल्या औरंगपुत्र अकबर याला सह्यांनिशी लिहीलेले राष्ट्रद्रोही पत्र आणि त्यानंतर संभाजी राजांनी या द्रोह्यांना दिलेल्या यथोचित शिक्षा...
ज्या दिवशी मला खरे शंभूराजे समजले त्या दिवसापासून या सर्व घटना आणि त्या ज्या भुमित घडल्या तो सुधागड माझ्या प्रचंड औत्सु्क्याचा, श्रद्धेचा विषय. दोन चार दिवसांपूर्वी ठरल्या नियोजनानुसार ही तिर्थयात्रा केली. पावन झालो.
नाईट ट्रेक केला. संध्याकाळी कामं उरकून निघालो. रात्री गड चढलो. निम्मा किल्ला रात्री फिरलो लखलखत्या चांदण्यात. मग मुक्कामाच्या ठिकाणी गडावरील पंतसचिवांच्या वाड्याशेजारी. सकाळी दुर्गभ्रमण करुन साडे नऊ दहाला परतीचा प्रवास सुरु. राजधानीसाठी ज्या काही किल्ल्यांचा विचार झाला त्यात सुधागडचा नंबर वरचा होता. शिवरायांबरोबरच शंभूराजांच्या कारकिर्दीतही या किल्ल्याचे महत्वाचे योगदान. आजही हा किल्ला लाखोंचा पोशिंदा आहे.





















काही गोष्टी मुद्दाम ठेवल्यात पहायच्या... तुम्ही उद्या चल म्हटले तर यायला थोडं रिजनेबल कारण पाहिजे ना... wink emotico

n

घनगड

सिंधुदुर्ग किल्याच्या रक्षणासाठी ज्याप्रमाणे नालाकृती रचनेत पुरक किल्ल्यांची रचना आहे, तशीच रचना घाटाखालचा सुधागड आणि त्याभोवती घाटावरील घनगड, तैलबैैल, कोरीगड यांचीही आहे. घनगड हा सुधागडचा सर्वात जवळचा पहारेकरी. अगदी समोरासमोर आहेत... पण मध्ये खोल दरी आहे. सुधागड पाहिल्यानंतर हा किल्ला पाहण्याची मजा काही वेगळीच.
वैशिष्ट्यपूर्ण स्थानामुळे हा टेहाळणीचा अप्रतिम किल्ला आहे. सर्वसाधारणपणे आसपासच्या डोंगररांगाहून अधिक उंचीच्या व स्वतंत्र घेरा असलेल्या डोंगरावर किल्ले बांधले जातात. हा किल्ला त्याला अपवाद आहे. या किल्ल्याला जोड असलेला डोंगर याच्याहूनही कासरा दोन कासरा उंच आहे. पण हे स्थानच वेगळे आहे. प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय घुसणार नाही.
सुधागड कोकणात रायगड जिल्ह्यात तर घनगड पुणे जिल्ह्यात. मुळशी धरणाच्या बॅकवॉटरला. घनगडाभोवती पसरलेलं जंगल, निसर्गसंपदा, विविध प्रकारची भुरुपं, शेती - पिकं आणि माणसं सारंच ए वन आहे. एकदा माथ्यावर गेलं तर तासनतास पाय निघणार नाही, हलणार नाही असा भवताल.
घनगड वाचण्याचा नाही... अनुभवण्याचा विषय आहे.













तैलबैल

ही अशी खड्या कातळातील उभी भिंत उभ्या आडव्या भारतवर्षात एकमेव असावी. एक नाही दोन भिंती. दोन्ही मिळून एक भिंत. तिच्या पोटापोटानं फिरायचं किंवा तिच्या बोकांडी चढायचं... दोन्हीही दिव्यच. तिच्याकडं नुसतं मान वर करुन पाहिलं तरी साली अंगावरच येते. डोळ्यांच्या खोबणीला बुब्बुळांचंही ओझं होतं.








किल्ले भोरगिरी

उद्या कधी काळी सन्यास घ्यायची, भुमिगत व्हायची किंवा कुठं अज्ञातवासात जावून अज्ञातानंद लुटायची वेळ आली किंवा वैराग्य धारण करुन एखादा बोधग्रंथ लिहायचं ठरलं तर किल्ले भोरगिरी फुल अॅन्ड फायनल.
हाये काय... भिमाशंकरच्या पायथ्याला इन मीन 150 मिटर उंचीचा छोटेखाणी डोंगरी किल्ला. वाटही सोपी. पण लोकेशन सोपं नाही... मनावर गारुडच करुन टाकतं. शिवशंकराच्या गुहेत थंडाव्याला बसलं की समोर सारं भोरगिरी पसरलेलं. भिमाशंकराच्या डोंगरावरुन भिमा गावात उतरतेय, भिरगिरी किल्ल्यावरुनही एक नदी उगम पावून कासराभर अंतरावर भिमेला मिळतेय. त्यावर बांधलेले बंधारे. तो पाणीसाठा आणि साऱ्या आसमंतात खिळून राहीलेला प्रचंड उल्हासित थंडावा. डोळे उघडे ठेवले तरी ध्यानस्त आणि मिटले तरी ध्यानस्त. अजून काय पाहिजे. किल्ल्यावर आणि पोटाशीही लेणी आहेत. नवव्या शतकात त्यांची निर्मिती झाली असे माणले जाते. हा किल्ला मुघलांच्या आणि शिवरायांच्याही साम्राज्यात होता.
भोरगिरी गाव मोठं वैशिष्ट्यपुर्ण आहे. खेड तालुक्याचं पश्चिम टोकाचं हे अखेरचं गाव. या ठिकाणी 33 कोटी देवांची भिमासुराला मारण्याबाबतची बैठक झाली. त्यात शिवशंकराने ही जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि आत्ता जेथे भिमाशंकराचे मंदीर आहे तेथे त्याला मारला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक पवित्र ठिकाण. पण त्याचे दर्शन सत्कारणी लागायचे असेल तर त्याआधी भोरगिरी गावातील शंकराच्या मुख्य मंदीरात येवून दर्शन घ्यावे लागते आणि मग भिमाशंकराचे दर्शन घ्यावे लागते, असे पुराणात लिहीलंय असं इथले समाजबंधू सांगतात. या मार्गे पायी भिमाशंकरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.














पुरंदरच्या तहातील किल्ले

शिवरायांनी पुरंदरच्या तहात 11 जून 1665 रोजी स्वराज्यातील 23 किल्ले व त्याभोवतीचा सात लाख होनाचा प्रदेश मिर्झाराजा जयसिंगाच्या... मुघलांच्या हाती दिला. ऐतिहासिक, राजकीय, भौगोलिक, नैसर्गिक दृष्ट्या हे किल्ले आणि त्याभोवतीचा प्रदेश अतिशय महत्वपूर्ण आहे. आवर्जून पहावा अभ्यासावा असा.
यातील अनेक किल्ल्यांची नावे सोडली तर इतर माहिती विकिपीडियावरही नाही. जुने इतिहास कम धर्मग्रंथ प्रत्येकाच्या हाती लागतील आणि पचतील असेही नाही. आमचे यातील पहिले 11 अनुभवून झालेत. अजून 12 बाकी आहेत. येत्या दोन वर्षात नक्की like emoticon
1) पुरंदर, 2) सिंहगड, 3) तुंग, 4) तिकोना, 5) लोहगड, 6) विसापूर, 7) मनरंजन (राजमाची), 8) कर्नाळा, 9) प्रबळगड - मुरंजन, 10) रोहिडा, 11) वसंतगड,
12) अंकोला, 13) कोहोज, 14) खिरदुर्ग (सागरगड), 15) नंगगड, 16) नरदुर्ग, 17) पळसगड, 18) भंडारगड, 19) मानगड, 20) मार्गगड, 21) माहुलीगड, 22) रुद्रमाळ, 23) सोनगड

दुधसागर, गोवा-कर्नाटक

दुधसागर. गोवा - कर्नाटक सिमेवरील अतिभव्य, सर्वांगसुंदर, नयनरम्य धबधबा. जन्नत नाही तर दुसरं काय. दोन दिवसांपुर्वी सहकुटुंब सहपरिवार गेलो. मनसोक्त अंगावर घेतला. आंतरबाह्य घुसळून निघालो.
अर्णवला सोबत घेवून दुधसागरच्या तळाच्या तळ्यात मस्त पोहलो. अर्णवच्या भाषेत सांगायचं तर मस्ती घातली. उताणे पोहत वरुन कोसळणारा संपूर्ण धबधबा पाहण्याची मजा औरच. चेन्नई एक्स्र्पेस चित्रपटामुळे हा धबधबा घराघरात पोचलाय. पण त्याची खरी मजा दुरचित्रवाणी पेक्षा स्वानुभुतीतच आहे. तो आवाज, खळाळ, शिट्ट्या पाखरांचा गलबलाट... तो मस्त अविरत कोसळतोय आणि संपन्नतेनं गच्च भरलेल्या अभयारण्यातील प्रत्येक चराचर त्याला आपापल्या नादात मस्त साथसंगत करतेय. अफलातून मैफिल...
अनेक दिवसांपासून हा ट्रेक करायचं चाललेलं. पण हुकायचा. दरम्यान गेल्या दोन वर्षात हे ठिकाण फॉरेस्ट वाल्यांनी पिंजऱ्यात टाकलंय. रेल्वे रुळावरुन धबधब्याकडं जाणारी जी वाट होती, ती बंद करण्यात आलीये. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. महावीर अभयारण्यात फक्त मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश दिला जातोय. यामुळे लोहमार्गावरुन दुधसागरच्या पुर्वीच्या मुसाफिरीला लगाम बसलाय.
अभयारण्यात खासगी वाहनांना प्रवेशबंद आहे. त्यासाठी पायथ्याच्या गावातून स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 400 रुपये शुल्क घेतात. अभयारण्यात प्रवेशाचे 30 रुपये तिकीट. शिवाय लाईफ जॅकेट बंधनकारक आहे. त्याचेही 30 रुपये शुल्क आहे. म्हणजे 500 रुपये प्रतिव्यक्ती खर्च आहे. पण धबधब्यावर पोचलं की उरात उतरणारी जन्नत लाख मोलाची आहे.
यंदा पाऊस कमी झालाय. त्यामुळे धबधबाही पुर्वीच्या जोशात नाही. नेहमी नोव्हेंबरपासून पर्यटकांना तो खुला होता. यंदा महिनाभर आधीच सुरवात झालीये. दररोज 250 ते 300 जीप (प्रतिजीप 7-8 जण) भरुन धबधब्यावर जात आहेत. आता पुढील सहा महिने हे ठिकाण असेच ओसंडून वाहत राहील. पाण्याने, गर्दीने आणि आनंदाने !
(गेल्या वर्षभरात किंवा नुकतंच आपल्यातलं कुणी जर रेल्वे रुळाच्या रस्त्याने दुधसागरला चालत गेलं असेल तर अनुभव, माहिती व कसं काय मॅनेज करायचं ते सांगा. इंटरनेटवर या ट्रेकविषयी उपलब्ध असलेली सगळी माहिती जुनी आहे. तिच्या आधारे उद्योग करायला गेल्यास तोंडावर पडायची शक्यता अधिक. मला त्या मार्गेहा अफलातून ट्रेक करायचा आहे...)
- संतोष डुकरे