दुधसागर. गोवा - कर्नाटक सिमेवरील अतिभव्य, सर्वांगसुंदर, नयनरम्य धबधबा. जन्नत नाही तर दुसरं काय. दोन दिवसांपुर्वी सहकुटुंब सहपरिवार गेलो. मनसोक्त अंगावर घेतला. आंतरबाह्य घुसळून निघालो.
अर्णवला सोबत घेवून दुधसागरच्या तळाच्या तळ्यात मस्त पोहलो. अर्णवच्या भाषेत सांगायचं तर मस्ती घातली. उताणे पोहत वरुन कोसळणारा संपूर्ण धबधबा पाहण्याची मजा औरच. चेन्नई एक्स्र्पेस चित्रपटामुळे हा धबधबा घराघरात पोचलाय. पण त्याची खरी मजा दुरचित्रवाणी पेक्षा स्वानुभुतीतच आहे. तो आवाज, खळाळ, शिट्ट्या पाखरांचा गलबलाट... तो मस्त अविरत कोसळतोय आणि संपन्नतेनं गच्च भरलेल्या अभयारण्यातील प्रत्येक चराचर त्याला आपापल्या नादात मस्त साथसंगत करतेय. अफलातून मैफिल...
अनेक दिवसांपासून हा ट्रेक करायचं चाललेलं. पण हुकायचा. दरम्यान गेल्या दोन वर्षात हे ठिकाण फॉरेस्ट वाल्यांनी पिंजऱ्यात टाकलंय. रेल्वे रुळावरुन धबधब्याकडं जाणारी जी वाट होती, ती बंद करण्यात आलीये. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतात. महावीर अभयारण्यात फक्त मुख्य प्रवेशद्वाराने प्रवेश दिला जातोय. यामुळे लोहमार्गावरुन दुधसागरच्या पुर्वीच्या मुसाफिरीला लगाम बसलाय.
अभयारण्यात खासगी वाहनांना प्रवेशबंद आहे. त्यासाठी पायथ्याच्या गावातून स्वतंत्र वाहतूक व्यवस्था आहे. त्यासाठी प्रतिव्यक्ती 400 रुपये शुल्क घेतात. अभयारण्यात प्रवेशाचे 30 रुपये तिकीट. शिवाय लाईफ जॅकेट बंधनकारक आहे. त्याचेही 30 रुपये शुल्क आहे. म्हणजे 500 रुपये प्रतिव्यक्ती खर्च आहे. पण धबधब्यावर पोचलं की उरात उतरणारी जन्नत लाख मोलाची आहे.
यंदा पाऊस कमी झालाय. त्यामुळे धबधबाही पुर्वीच्या जोशात नाही. नेहमी नोव्हेंबरपासून पर्यटकांना तो खुला होता. यंदा महिनाभर आधीच सुरवात झालीये. दररोज 250 ते 300 जीप (प्रतिजीप 7-8 जण) भरुन धबधब्यावर जात आहेत. आता पुढील सहा महिने हे ठिकाण असेच ओसंडून वाहत राहील. पाण्याने, गर्दीने आणि आनंदाने !
(गेल्या वर्षभरात किंवा नुकतंच आपल्यातलं कुणी जर रेल्वे रुळाच्या रस्त्याने दुधसागरला चालत गेलं असेल तर अनुभव, माहिती व कसं काय मॅनेज करायचं ते सांगा. इंटरनेटवर या ट्रेकविषयी उपलब्ध असलेली सगळी माहिती जुनी आहे. तिच्या आधारे उद्योग करायला गेल्यास तोंडावर पडायची शक्यता अधिक. मला त्या मार्गेहा अफलातून ट्रेक करायचा आहे...)
- संतोष डुकरे











No comments:
Post a Comment