Sunday, November 1, 2015

घोळ ते रायगड - 3 रा दिवस


घोळ ते रायगड - 2 रा दिवस


घोळ ते रायगड - 1 ला दिवस


कोथरुडचा चांभार


आज परत ट्रेकिंगला का ? हातातलं युगंधर बाजूला ठेवून त्यानं मला विचारलं.
- हो...
काम धाम करता काही, की नुसतच फिरता ? आता त्यानं माझ्या बुटाला हात घातला.
- करतो ना. फिरण्यापुरतं कमवतो आणि फिरतो.
मला पण लय आवड व्हती हो.... इनर सोल बदलता बदलता गडी बोलायला लागला...
चौथीला होतो तेव्हा माझा सगळा इतिहास पाठ होता. कुठलाबी गडकोट विचारा. तव्हाच ठरवल्यालं शिवरायाचं सगळं किल्लं बघायचं. पण चौथीत शाळा सुटली. आणि काम पडलं. मग संसार पोरं बाळं. फिरायचं राहून गेलं सगळं. आता चार पाच वर्षात शेवटच्या पोराचं मार्गी लागल. मग मी सगळे किल्ले फिरणार...
युगंधरकडे बोट दाखवल्यावर म्हटला... हातातलं काम संपल्यावर इकडं तिकडं बघत टाईमपास करत बसण्यापेक्षा पुस्तकांत डोकं घालून बसतो. ही आता चौथ्यांदा वाचून होत आली तेव्हा कुठे तिचे सर्व संदर्भ डोक्यात घुसायला लागलेत.
लेस बदलल्यावर म्हटला... ही घेवून जा तुमच्यासोबत जुनी लेस. मी डिस्कव्हरीवर पाहिलं, खूप कामाला येवू शक्ते ती तुमच्या. ८० रूपये झाले म्हटला. १०० दिल्यावर ४० परत दिले. म्हणे असू द्या हो... माझं स्वप्न तुम्ही जगताय. मग मी २० रुपये कमी नाय घेवू शकत काय...
इथं प्रत्येक ह्दयात आस आहे, शिवबाचा ध्यास आहे.
आणि त्या वाटेवर चालणारांना, लक्ष हातांची साथ आहे.
उगच येडी म्हतारी जनता काशी चारधाम ला नेण्यापेक्षा, ह्दयात आग ठेवून सक्षम नवी पिढी घडविण्यासाठी स्वतःच्या स्वप्नांवर पाणी सोडून झटलेल्या जुन्या पिढीची कड कोट किल्ल्यांच्या वारीची स्वप्न पूर्ण करण्यासाठी, त्यांना सह्याद्री सातपुड्याशी जोडण्यासाठी एखाद्या संस्थेची गरज आहे. असं उगाच वाटून गेलं.
@ गांधी भवन कॉर्नर, कोथरुड

रायरेश्वर - 15 ऑगस्ट 15

किल्ले रायरेश्वरावर दाट धुके व श्रावणसरींत स्वातंत्र्यदिनाचे झेंडावंदन करण्याची संधी अवर्णनियच.
रात्री १० वाजता चढाई सुरू केली. केंजळगड व रायरेश्वराच्या खिंडीत एका सपरात मुक्काम केला आणि पहाटे ४ ला रायरेश्वर गाठला. झेंडावंदन झाले आत्ता. आता चलो केंजळगड... पृथ्वीवरच्या स्वर्गात आहोत आज.







केंजळगड, सातारा - 15 ऑगस्ट 15

भोर ते महाबळेश्वर दरम्यानची सर्व पठारं, किल्ले, डोंगर दऱ्या स्वर्गाहून कमी नाहीत सध्या. एक बर्फ सोडला तर काश्मिर आणि हिमालयातील सर्व निसर्गरुपं सध्या इथं अवतरली आहेत. सोबत जिवाभावाचे दोस्त असतील तर काय बोलावं...






















चालणारे पाय


जनरली अशा बाबी कुणी कुणाला सांगत नसतं. पण आमच्या चेतन नलावडेने विषय काढला म्हणून रहावलं नाही.
आठ पंधरा दिवसापूर्वी पानशेत ते रायगड ट्रेकला भिकाजी दादांनी Bhikaji Chavanडीकॅथेलॉनमध्ये खास ट्रेकिंगसाठी साडेतीन हजार खर्चून घेतलेले शुज घातले. पण पहिल्या दगडावर पाय ठेवला आणि ट्रेकिंगचा आणि आमचा काही संबंध नाही हे त्या दोन्ही बुटाडांनी जाहिर केलं. परिणामी पुढचा संपूर्ण अडीच दिवसाचा अतिशय अवघड स्थितीतला ट्रेक प्रत्येक पाऊल दहादा विचार करुन तपासून टाकण्याची वेळ आली त्यांच्यावर. त्या बुटांचा दादांनी एवढा धसका घेतला की अनेकदा हात पाय टेकवून उतरले.
हीच कथा चार दिवसापुर्वीच्या रायरेश्वर केंजळगड ट्रेकची. नशीब त्यावेळी आमच्या जेष्ठ ट्रेकर सहकाऱ्यांने दोन तीन जनांनी एकाच वेळी घेतलेले साडेतीन चार हजार रुपयांचे ट्रेकिंग साठीचे शुज पावसाळ्यात उपयोगाचे नाहीत, पावलोपावली घसरुन पडण्याची शक्यता आहे, असे जाहिर केले. आणि मग आमच्या रमेशजींनी Ramesh Uttamrao Jadhav मी दरेक ट्रेकला घसा कोरडा पडेपर्यंत माझ्या शुजचे (अॅक्शन ट्रेकिंग) घसा कोरडा करेपर्यंत करतो ते कौतुक सिरीयसली घेतली आणि नवे कोरे शुज ताफ्यात दाखल केले.
या ट्रेकला माझ्यासह (कारण माझे शुज अती वापराने अकाली वार्धक्याकडे झुकलेत) सहकारी किमान एकदा तरी घसरुन पडले. जेष्ठ ट्रेकर तर एका नवाट गृप ला पायऱ्या कशा चढाव्यात याचं प्रात्यक्षिक दाखवतानाच पाय घसरुन केंजळगडाच्या तीन पायऱ्या ढुंगाडावर टून्नूकटून्नक आदळत गेले. पुन्हा पाऊस झाल्यावर त्यांनी गिरकी घेत पसरण घेतली तेव्हा त्यांची मजा पाहता पाहता माझीही गाडी उराळी झाली. उरलेल्या युवा उद्योजकांनी पडापडीचा अनुभव घेतल्यावर पार्श्वभागाची घसरगुंडी करुन उतरणे पसंत केले.
पण.... या सर्व पडझडीत संपूर्ण ट्रेकमध्ये फक्त एक माणूस एकदाही घसरला नाही. तो म्हणजे अॅक्शन ट्रेकिंग वाले रमेश जाधव. यावरुन ट्रेकिंग शुजचे महत्व जाणकारांनी समजून घ्यावे. रमेशजी आता अॅक्शन ट्रेकिंग शुजचे ब्रॅन्ड अॅबेसेडर झालेत. केंजळगड उतरत होतो तेव्हा अनेक पहिलारु, नवखे ट्रेकर चप्पल, कॅन्व्हास शुज किंवा ते ही तुटून फाटून गेल्यावर जखमी अवस्थेत फक्त सॉक्स घालून ट्रेकिंगची रिस्क घेताना भेटले. त्यांना कोणते शुज घेणार... असे पाचदा तरी घोकून घेतलं आम्ही... शेवटी सिर सलामत तो पगडी पचास. नाही का...
(चेतन Chetan Nalavade लवकरच स्वतःच्या सेफ्टी इक्विपमेंट कंपनीमार्फत खास ट्रेकिंगसाठीचे नवीन शुज लॉंच करतोय. मित्रा शुभेच्छा.. टेस्टिंग रिपोर्ट तुला देईलच wink emoticon )

नारायणगडावरची बाई

दिवस कडाक्यात संपला आणि कालाष्टमीची गुढ अंधारी रात्र सुरु झाली. पुणे ट्रेकर्स चा एक इंजिनियर, दुसरा मॅनेजर आणि तिसरा डॉक्टर ट्रेकर एका बॅटरीच्या उजेडात नारायणगडाची वाट चालू लागले. पुणे ट्रेकर्स म्हणजे आमावस्येचे ट्रेक असं गेली तीन वर्षाचे समिकरण. शिवरायांनी सर्व स्वाऱ्या आमावस्येच्या रात्री केल्या या संदर्भाचीही किनार. पण आजची रात्र वेगळी होती.
एक गृप पुण्यात वाघाच्या तावडीत सापडलेल्या सिंहगडाच्या विचारात तर दुसरा गावी गेलेला गृप घरदार सोडून शिवनेरीच्या कुशीत झोपण्याच्या तयारीत. सहा चा आकडा तीन वर आला आणि शिवनेरीवरचा मुक्काम ऐन वेळी नारायणगडाकडे झुकला. सहा सराईत पावलं रान कापत होती.
पायथ्याचं मंदीर मागं टाकलं. पायऱ्या आणि वारा उर दडपत होता. रातकिड्यांचीच तेवढी काय ती साथ... आणि दूर खोडदात चमकत्या चांदण्या. देवकीला अजून कळा यायच्या होत्या. मग पायलीचे पन्नास विषय चावून विषय इंद्राणीवर घसरला...
मजल दरमजल करत कोसभराचा निर्मनुष्य टापू पार करुन किल्ल्याचा माथा गाठला. मंदीर दृष्टीक्षेपात आलेलं. गाभाऱ्यातील दिव्याचा प्रकाश बाहेर पसरत होता. शिनवट्यानं अंग घामेजलेली. आता फाटक उघडायचं आणि हे... गार फरशीवर ताणून द्यायची. कासराभरच अंतर. मॅनेजरनं गेट उघडून आत पाहिले आणि गडी व्हलपटलाच. पांढरी साडी घातलेली काळीकुट्ट बाई कोपऱ्यात उभी होती. इंजिनिअरने डॉक्टरच्या अंगावर पडता पडता पाहिलं तर भयानक आकृती. सराईत पावलं सावरायला क्षणभर पुरला. दुसऱ्या क्षणी बॅटरीचा फोकस बाईवर...
गडी घाबरलं आणि बाई चार फुटावर दात विचकत भयाण हसत होती. ताई इथे काय करताय ? या पहिल्या प्रश्नाने भितीला सुरुंग लावला. ताई म्हणे मी इथेच असते. याची डोकी औट. आम्ही तर अनेकदा येतो. तुम्ही दिसला नाही कधी. मग ताई म्हणे... नाही मी आजच आले पहिल्यांदा. गडाच्या अत्युच्च टोकावर भयाण अंधारात ही पांढरी साडी घातलेली काळीकुट्ट बाई आणि त्यात तिची ही अशी उत्तरं. ट्रेकर गडी जाम.
मग इंजिनिअरने डोकं चालवलं... ताई, तुमच्या सोबत अजून कुणी असेल तर त्यांनाही बोलावून घ्या. तुम्ही इथे झोपा आम्ही बाहेर थांबतो पहारा देत. मी एकटीच आहे. ताईचं उत्तर पटेना. सारंच शंकास्पद. शेवटी तिघेही मंदीरातून बाहेर पडले. सर्व गड धुंडाळून काढला. पण बाईचा मैतर सापडेना. पु्न्हा आले मंदीरात. प्रश्नाची सरबत्ती सुरु होती... तिच्या चेहऱ्यावर भिती, चिंता दूर... उलट विलक्षण समाधानाचे भाव. शेवटी म्हणे बहिणीशी भांडण झाले
म्हणून आले इथे. नाव विचारलं तर कधी जाधव तर कधी दुसरं काही सांगायला लागली. वेडी नव्हती पण बोलात बोल लागेना. बरं ती तिथं व्हरांड्यात लोकांनी देवीला वाहिलेल्या हिरव्या साड्या अंगाखाली आथरुन आणि पांघरुन झोपायच्या तयारीत. मग ट्रेकर्सने झोपायचं कुठं ?
ताईला मंदीरात एका कोपऱ्यात झोपू द्यावं आणि आपण दुसऱ्या कोपऱ्यात झोपावं. पण उद्या काही उलटी बोंब झाली तर. तिनं काही जिवाचं बरं वाईट केलं तर. इंद्राणी परवडली पण हे नसतं लफडं नको. शेवटी ताई तुम्ही तुमच्या घरी जा. मंदीरात आम्ही झोपणार आहोत. पण ताई म्हणे मला गड उतरायला पायऱ्या दिसणार नाहीत. आता ही नवी आफत. शेवटी बॅटरी नको पण बाई जाऊद्या... दिली बॅटरी तिला आणि निट जायला सांगितलं घरी. बॅटरी गड उतरु लागली.
तरिही इंजिनिअरच्या जिवात जिव नव्हता. ही खाली कोसळली तर. थोड्या अंतरावर बॅटरी घुटमळायला लागली. गडावर पुन्हा तर्क वितर्कांना उत. नक्की तिचा जोडीदार तिथं असणार. पण दुसऱी बॅटरी दिसेना. अर्धा तास बॅटरी तिथंच घुटमळली, पण बंद झाली नाही. पुन्हा बॅटरी खाली निघाली. जाऊ द्या आता खाली मंदीर, घरं आसरा आहे चांगला. जाईल ती तिच्या घरी म्हणून गडावरचे दोन जिव बिनधास्त झाले. तिसऱ्याच्या मनात मात्र धाकधुक कायम होती. ताईच्या मनात पुन्हा भावांविषयी प्रेम जागृत झाले आणि तिने वर येवून डोक्यात द-गड घातला तर... मरा तिच्या आयला. झोपंचं खोबरं...
थरथरत्या हवेत थरथरती झोप झाली. ट्रेकर्स पहाटे उठले. गड उतरले. ताईची चौकशी केली. पण कुणाला काही माहिती नाही. बॅटरीचा काही मागसूस नाही. खोडदची किंवा गडाच्या वाडीची नसावीच बहुधा ती. कदाचित मावळी असेल. कदाचीत ठाकर, कातकरी. कदाचित कुणीच नसेल.
पण... नर्स आणि मास्तरणी सोडल्या तर इथे पांढरी साडी गठुडी पालथी घालूनही सापडणार नाही. मग ही पांढरीच साडी घालून गडावर का आली. तिनं देवीच्या साड्या आंथरुॉन पांघरुन का घेतल्या, हा एखाद्या अघोरी प्रथेचा, पुजा अर्चेचा, व्रत वैकल्याचा तर भाग नसेल. बरं तीचं लग्न नुकतंच झालं असावं असं वाटत होतं. मग नेमका काय प्रकार. की गुप्त खजिना वगैरे शोधणाऱ्या मेंटल टोळ्यांमधली असेल ही... खजिन्याच्या दिशेच्या शोधात देवीच्या आराधनेत.
तिच्याकडे एक पिशवी होती, पण तिच्यात फार थोडे सामान असावे काहीतरी. कदाचित गंडादोरी किंवा बिब्बे वगैरेही. या गडावर पुर्वीही खजिना शोधण्याचे वेडे चाळे केलेत म्हणे काहींनी. हा ही तसाच तर प्रकार नसेल... की खरंच ती घरी भांडण करुन विक्षिप्तपणे गडावर आली होती देवीच्या आसऱ्याला...
एक नार, तीन बेजार आणि प्रश्न हजार...

चंदन & वंदन, सातारा

नेहमीसारखं अवचित सारं ठरलं आणि माझी फाटकी झोळी आनंदानं भरुन गेली.
अचानक केलेल्या ट्रेकची वेगळीच मजा असते. ट्रेकिंगचे आत्तापर्यंत झालेले सारे संस्कार पणाला लागतात. सारं काही आपत्कालिन आणि त्यातून समोर येणारा प्रत्येक क्षण निस्सिम आनंद देणारा. प्रत्येक नजर दृष्टीभरची सृष्टी काळजात रुजवणारी. सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील हे दोन जुळे किल्ले. जुळे पण वेगळे. दोन्हींची वैशिष्ट्ये वेगळी, बलस्थाने वेगळी आणि आज त्यावर संपन्नतेनं फुललेलं नंदनवन वेगळं. येईल त्याला, पाहिल त्याला, अनुभवेल त्याला समृद्ध करणारं.
आम्ही रात्री दीड की दोन वाजता पुणे सातारा रस्त्यावरील भुईंज गावातून पुर्वेकडे वळण घेतले आणि किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना ओलांडून जवळचं किकली हे गाव गाठलं. दरम्यान भुईज फाट्यावर एक पोट्ट्या भेटला. त्यालाही किकलीला यायचं होतं. मग गडाच्या पायथ्यापर्यंतची रेकी त्यानं करुन दिली आणि आम्ही किकली गावठाणावरील मंदीराच्या मंडपात उघड्यावर ताणून दिली. रात्रीचे अडीच वाजले होते, सारा गाव घोरत होता.
पहाटे 6 ला गाडीला स्टार्टर मारुन हाकेच्या अंतरावरील बेलमाची गाव गाठलं. आणि चढणीला सुरवात केली. संपूर्ण पावसाळा मोकळा गेल्यानंतर आठ दिवसांपूर्वी एक जोराचा पाऊस होवून गेलेला. त्यावर तरारलेल्या टिचभर गवतानं वाटा गिळलेल्या. त्यात गाय-बैलांनी दर ओवाभर अंतरावर नव्या वाटांच्या खाणाखूणा ठेवलेल्या. दोन्ही किल्ल्यांच्या पोटाला सीसीटी सीसीटी खेळल्यानंतर खिंडीची मुख्य वाट पकडून खिंडीत आलो आणि पहिले वंदनगडाकडे वळलो.
ईद चा दिवस आणि किल्ल्यावर प्रसिद्ध दर्गा. गेलो. मस्त दर्शन घेतलं. गडावरील सर्व तलाव, झाडी, आसपासचा नजारा, सर्व दरवाजे, शिलालेख, कोठार फिरुन पाहीले. उतरताना हे पाहिलं ते आजपर्यंतचं सर्वोत्तम... मानगावच्या बाजूच्या दरवाजात दगडांचा ढिग पडलाय. तेथे एका दगडात गणपती कोरलेला आहे. जरा पहावं म्हणून थोडं खाली गेलो तर एक अजस्त्र घोरपड चारी पाय ताठ करुन मोठ्या तोऱ्यात मागे वळून माझ्याकडे पाहत होती.
आयुष्यात घोरपडी अनेक पाहील्या, पण ही सगळ्यांची आई होती. 4 फुट तर नक्कीच. दोन्ही हाताच्या बोटांच्या घेऱ्यात मावणार नाही एवढी जाडी. तानाजी सिंहगडावर घोरपडीच्या मदतीने चढला ही आत्तापर्यंत मी भुक्कड कथा समजायचो. पण साला ही अशी घोरपड तुमच्या आज्ञेत असेल तर सिंहगड काय पण मंगळही सर होऊ शकेल असं उगाच वाटून गेलं. शरदनेही ती पाहिली. पण संजय येईपर्यंत ती पुन्हा दगडांमध्ये गडप झाली. तिचा फोटो हुकल्याची रुखरुख अजूनही आहे.
वंदन करुन चंदनला बिलगलो. सरळसोट कड्याने वर चढायचं ठरलं. पहिला टप्पा पार केला आणि पुढचा टप्पा आपल्या आवाक्यातला नाही हे लक्षात आलं. कारण... गेल्या 12 महिन्यांच्या कडक उन्हाळ्याने या कड्याने माती सोडलीये. गवत फक्त नावापुरतं मुळ्या मातीत घट्ट नाहीत. त्यात खडेमिश्रीत माती. लगेच जागा सोडणारी. उजवी घालत कड्यांच्या कपारीने मुख्य दरवाजाकडे जायचे ठरवले. तो कुठे आहे हे माहित नव्हतं, पण दिशा चुकीची नाही ही खात्री होती.
अंदाजे धरलेल्या या वाटेवर आमच्यासाठी मोठा नजारा खुला होता. लवणस्तंभ. आत्तापर्यंत शे दिडशे किल्ले पालथे घातले, पण प्रोग्रेसिंग अवस्थेतील चांगले लवणस्तंभ कुठे दिसले नव्हते. ती कमी चंदनगडाने भरुन काढली. गडाच्या उजव्या बाजूच्या कपारीच्या पोटाला लवणस्तंभ वाढत आहे. वरुन ते चांगले दोन तीन फुट वाढलेत. तर लवणस्तंभातून खाली पाणी ठिबकते त्या ठिकाणाहून वरच्या दिशेनेही त्याची वाढ सुरु आहे. मानवी वा पशुंचा हस्तक्षेप झाला नाही तर वरुन खाली व खालून वर अशा दोन्ही बाजूला वाढ होवून येत्या पाच पन्नास वर्षात हे स्तंभ उभे राहतील.
चंदनगडाचा बनवडी वरुन येणारी मुख्य वाट व त्या बाजूचा एकमेव मुख्य दरवाजा सापडला आणि चढलो. अतिरेकी माकडं आमच्या स्वागताला हजर होती. हातात दगड घेवून त्यांना चुचकारीत दुर्गभ्रमण झालं. या गडावर अतिशय सुंदर, गोड व थंड पाण्याची खोल विहीर आहे. ती आजपर्यंत कुणीही कधीही आटलेली पाहिलेली नाही. वापरात आहे. गड फिरलो आणि उतरायला आम्ही जेथून चढायचा प्रयत्न केलेला तेथे आलो.
रेकीनुसार साधे सोपे गड आहेत म्हणून हार्नेस, क्लिप, ग्लोज इ. सर्व सामग्री बेसकॅम्पला गाडीत ठेवलेली. हो ना करत मी रोप तेवढा आग्रहाने बरोबर घेतलेला. आता हा सुमारे 30 - 40 मिटरचा कडा रोप लावून नंग्या हातांनी उतरायचं ठरलं. त्यासाठी दोन शिवभक्त अल्पवयीन गुराखी मित्रांची मोठी मदत झाली. भलतीच चिवट पोरं. त्यातला एक बिना दोराचा खाली गेला. आम्ही सगळे खाली उतरल्यावर तो बिना दोराचा वर चढला.
हे म्हणजे चार्ली चॅप्लिनच्या त्या प्रसिद्ध मुकपटासारखं होतं. त्यात एक प्रचंड मोठा वेटलिफ्टर कन्हत कुथत मोठी वेट उचलतो. सभाग़ृह किंवा मैदान म्हणून हवं तर त्याला प्रचंड मोठी दाद देतं. तो पुरस्कार स्विकारुन बाजूलाा होता. आणि हा खेळ संपल्यानंतर कामगार असलेला चार्ली ती सगळी वजनं एका हातात उचलून बाजूला घेवून जातो. आम्ही कन्हत कुथत घसरत कडा उतरलो आणि हा पोट्ट्या कड्यात बोटं खुपसत चढून गेला. गड्याचं आयुष्यच या दगडांशी, कड्यांशी झुंजण्यात गेलंय तो कसला भिक घालतोय. पुर्वी या कड्याला छोट्याशा खाचा होत्या. ज्यात पाय टाकून दगडाला छाती लावून चढता, उतरता यायचं म्हणे. पण गेल्या बारा महिन्यात ते सर्व सपाट झालंय... रितं झालंय.
झालं. उतरलो किल्ला आणि आलो घरी. चंदन वंदनची नशा आता महिनाभर पुरेल. महिनाभर यासाठी की आज बरोब्बर महिन्याने कोजागिरी पौर्णिमा आहे. यंदाची कोजागिरी चंदनगडावर साजरी करायचा बेत आहे. पाहू... जसे सवंगडी जमतील तसे.












घनगडची मावशी


शेतकऱ्याच्या दारातून कधी कुणी मोकळ्या हातानं, रिकाम्या पोटानं परत जात नाही. दुर्गम भागात फिरताना हे नेहमी अनुभवतो. परवा मुळशीच्या बँकवॉटरला सह्याद्रीच्या माथ्यावर अचानक घनगडला गेलो. दुपारच्या पहारी जँम भूक लागली. शिधा तर सुधागड वरच संपलेला. मग नेहमीप्रमाणे स्थानिक शेतकऱ्याच्या घरी जेवण हाच पर्याय.
भांबुर्डेच्या टेपेवाडीत पहिलंच घर लागलं. मावशी वट्यावं काहीतरी करत होत्या. म्हटलं जेवण बनवून देता का वो ? लय भुक लागलीये. क्षणाचाही विलंब न लावता मावशी म्हणाल्या २-३ भाकरी हायेत आता टोपल्यात. तेवढ्या खावून घ्या. तुम्ही फिरून येतात तव्हर सैपाक करते.
तांदुळ ज्वारीची मिक्स भाकरी, लसणाची चटणी, आंब्याचं लोणचं ताव मारला. घनगडाचा टापू फिरून आलो तर स्वयंपाक तयार होता. बटाटा हरभऱ्याची शाख, तांदुळ ज्वारीची गरमागरम भाकरी, इंद्रायनी व लोकल व्हरायटींचा मिक्स भात... ए वन. नवरा बायकोनं अतिशय आग्रहानं खावू घातलं.
आम्हा पाच जणांच्या गृपमधला लहानगा रूषीकेश भात खायला नको म्हणाला. मावशी म्हणाली... बाळा फक्त एक घास घावून बघ. बाळानं आज्जीचं ऐकलं. एक घास खाल्ला आणि एवढा खूश झाला की बस्स. गडी नुसता वरण भातच खात सुटला. पाच जणांचं भरपेट जेवण, नाष्ता सारं काही टोटल बिल फक्त ३५० रूपये.
अविड चवीचं, सकस, गावरान अन्न आणि जोडीला मावशीनं त्यात ओतलेली माया, जिव्हाळा, प्रेम... त्यात काकाचा आग्रह. माया एवढी की निघताना मावशीनं रूषीचा मस्त मुका बिका घेवुन त्याला गावरान काकड्यांचा मेवाही दिला. जणू आम्ही त्यांच्या रक्ताचे जिवाभावाचे आहोत... ही अशी माणसं भेटली की जगण्यावर शतदा प्रेम करावंस वाटतं. त्यांच्या सहवासानं आपलंच जगणं समृद्ध होतं.
काकाचं नाव दत्ता कुंभार, मावशीचं सौ. सुनंदा दत्ता कुंभार. बिनभरवशाच्या शेतीत त्यांचा झगडा सुरू आहे. भात ऐके भात. जोडधंदाचं थिगळ लावायचं काम चाललंय. काका टेलरिंगचं मशिनकाम करतात, पिठाची गिरण चालवतात, मशागतीसाठी ट्रँक्टरचीही सेवा पुरवतात एवढं सगळं करूनही परिसरात लोकसंख्या विरळ असल्याने उत्पन्न तुटपुंजच. तशातही मुलामुलींना शिकवताहेत, एक मुलगा शिक्षक झालाय, दुसरा पुण्यात इंजिनिअरिंग करतोय. कुटूंब लढतंय.
- जमिन खरेदी विक्री तेजीत
मुळशी धरणाच्या बँकवॉटरला जमीनीची खरेदी विक्री गेल्या काही वर्षात मोठे व्यवहार झालेत. एकेका कंपनीने हजार हजार एकर-हेक्टर जमिन खरेदि केलीये. पण आता इको सेन्सिटीव झोनचं काय होतंय यावर या जमिनी झुलत आहेत. इको सेन्सिटिव्ह होवू नये, बंधने येवू नयेत म्हणून कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लवासातील २०० एकर जमीन कातकऱ्यांना परत करायचा आदेश कोर्टाने दिल्याने या भागातील लोकांना आशेचा किरण दिसतो आहे. जुळवाजुळव सुरू आहे. जमिनीचे एजंट सक्रीय आहेत. २५-३९ लाख रूपये एकर आडबाजूचा रेट आहे.
- आहाराचं नवं मिश्रण
कोणत्याही प्रकारचं सुखवस्तु जिवन नसतानाही पश्चिम घाटाच्या दोन्ही बाजूला मधूमेह फैलावत आहे. भाताचं अधिक्य असलेला आहार हे याचं मुख्य कारणं असं लोक सांगतात. यावर उपाय म्हणून इंद्रायणीसारख्या एकाच वाणाचा भात खाण्यापेक्षा त्यात जुन्या गावरान भात मिक्स करणे, फक्त तांदळाची भाकरी खाण्यापेक्षा भात व ज्वारी समप्रमाणात मिक्स करून त्याची भाकरी करणे असे विविध बदल आहारशैलीत होत आहेत.






सुधागडची माणसं

दम खावा जरा दम खावा. असा सुचना वजा आदेश देत कृष्णानं गवळणी आडवाव्यात तसं सुधागडच्या उतरणीला रामा बर्गे नं आम्हाला आडवलं. मावशीचा रोल भिकाजी दादा व माझ्याकडे आलटून पालटून...
गडी आमच्या कानुशानं पिठाचं बोचकं भर वाटंत ठेवून बाजूच्या दगडावर मामलेदारासारखा पायावर पाय व हातावर दाभाड टाकून बसलेला. आम्ही टेकायच्या आतच त्याची गण-गवळण सुरू झाली.
मी १५ वर्षे गडावर राहतो. मंदीरांची देखभाल ठेवतो.... खोटं कशाला बोलायचं ?
गडाखालून पिठ घेवून वर चाललोय. पोटाला खायला कायतरी लागतं... खोटं कशाला बोलायचं ?
पण आता दसऱ्याला गुरव येईल, सगळं डंबुलम घेवून जाईल... खोटं कशाला बोलायचं ?
दसऱ्याच्या टायमाला वाघाची यक तरी फेरी नक्की व्हईल, यक तरी गुरं वासरु नक्की मारील... खोटं कशाला बोलायचं ?
म्हतारी भेटली का तुमाला गडावं, तिची लय कमाई हे... खोटं कशाला बोलायचं ?
मला दुसरी कायच कमाई नायी. तुमच्या सारख्यांनी काही दिलं तर घ्यायाचं... खोटं कशाला बोलायचं ?
असं दर एक वाक्याच्या शेवटी खोटं कशाला बोलायचं ? असं प्रश्नार्थी उत्तरानं स्वतःचं जस्टिफिकेशन देत कृष्ण... सॉरी... रामा आमच्याकडं पैसे मागत होता. बाकी सगळं राहीलं बाजूला त्यानं त्याचं पेटंटेड स्पेशल हेलातलं जस्टिफिकेशन दिलं की हसू हसू मरायची वेळ.
एकीकडे हा असा कल्लोळाचा गडी. तर दुसरीकडे गडावरील सिद आज्जी म्हणजे साक्षात कारुण्याची देवी. भिकाजी दादा म्हणालेही... देवी, अप्सरा म्हताऱ्या झाल्यावर अशाच दिसत असतील का रे ? (म्हणजे दुसरा मँटर बिटविन दी लाईन अर्थ... तरूणपणी ही कित्ती कित्ती कित्ती सुंदर असेल ना रे wink emoticon
गड माथ्यावर दोन घरं आहेत. तिथं सिद म्हतारी म्हतारा राहतात. हा त्यांचा गडावरचा सच्चा शेजारी राहतो. आज्जी गडावर आलेल्यांना चहा पाणी, नाष्ता, जेवण देवुन अर्थार्जण करते. अतिशय लाघवी. गुचक्या देत बोलते पण एकेकशब्द जणू काही मोत्यात गाठलेला. कमालीची शांत, तृप्त. ती तृप्तता तिच्या वागण्या बोलण्यातून झळकते. चांदीच्या बाळ्यांच्या भारानं ओघळलेले कान, पायी पैजण, इतर अलंकार, आभुषणे आणि सुरकुत्याही कित्येक दशकांच्या तृप्त जिण्याची कथा सांगणाऱ्या...
परिस्थिती माणसाला घडवते आणि माणूस परिस्थितीला. दोघेही एकमेकांवर आपापली छाप सोडतात. त्यातून दोघांचेही स्वभाव तयार होतात. निसर्ग त्याला झालरी लावतो. मग कुणाचा हात देता होतो कुणाचा घेता. माणूस म्हणून हाती घेतले तर हे दोन्ही हात कमालीचं सौख्य देतात. एनरिच करतात.
सुधागडच्या व्हर्जिन वाऱ्यात फोफावलेल्या, अशा सर्व प्रकारच्या खोडींनी, गुणांनी भरलेल्या अप्रतिम माणसांना सलाम.



सुधागड, ता. सुधागड, जि. रायगड

संभाजी राजांविरुद्ध म्हणजेच स्वराज्याविरुद्ध झालेली कारस्थाने, त्या बावळटांनी औरंगजेबाशी बंड करुन संभाजी राजांशी मैत्री करण्यासाठी आलेल्या औरंगपुत्र अकबर याला सह्यांनिशी लिहीलेले राष्ट्रद्रोही पत्र आणि त्यानंतर संभाजी राजांनी या द्रोह्यांना दिलेल्या यथोचित शिक्षा...
ज्या दिवशी मला खरे शंभूराजे समजले त्या दिवसापासून या सर्व घटना आणि त्या ज्या भुमित घडल्या तो सुधागड माझ्या प्रचंड औत्सु्क्याचा, श्रद्धेचा विषय. दोन चार दिवसांपूर्वी ठरल्या नियोजनानुसार ही तिर्थयात्रा केली. पावन झालो.
नाईट ट्रेक केला. संध्याकाळी कामं उरकून निघालो. रात्री गड चढलो. निम्मा किल्ला रात्री फिरलो लखलखत्या चांदण्यात. मग मुक्कामाच्या ठिकाणी गडावरील पंतसचिवांच्या वाड्याशेजारी. सकाळी दुर्गभ्रमण करुन साडे नऊ दहाला परतीचा प्रवास सुरु. राजधानीसाठी ज्या काही किल्ल्यांचा विचार झाला त्यात सुधागडचा नंबर वरचा होता. शिवरायांबरोबरच शंभूराजांच्या कारकिर्दीतही या किल्ल्याचे महत्वाचे योगदान. आजही हा किल्ला लाखोंचा पोशिंदा आहे.





















काही गोष्टी मुद्दाम ठेवल्यात पहायच्या... तुम्ही उद्या चल म्हटले तर यायला थोडं रिजनेबल कारण पाहिजे ना... wink emotico

n