उद्या कधी काळी सन्यास घ्यायची, भुमिगत व्हायची किंवा कुठं अज्ञातवासात जावून अज्ञातानंद लुटायची वेळ आली किंवा वैराग्य धारण करुन एखादा बोधग्रंथ लिहायचं ठरलं तर किल्ले भोरगिरी फुल अॅन्ड फायनल.
हाये काय... भिमाशंकरच्या पायथ्याला इन मीन 150 मिटर उंचीचा छोटेखाणी डोंगरी किल्ला. वाटही सोपी. पण लोकेशन सोपं नाही... मनावर गारुडच करुन टाकतं. शिवशंकराच्या गुहेत थंडाव्याला बसलं की समोर सारं भोरगिरी पसरलेलं. भिमाशंकराच्या डोंगरावरुन भिमा गावात उतरतेय, भिरगिरी किल्ल्यावरुनही एक नदी उगम पावून कासराभर अंतरावर भिमेला मिळतेय. त्यावर बांधलेले बंधारे. तो पाणीसाठा आणि साऱ्या आसमंतात खिळून राहीलेला प्रचंड उल्हासित थंडावा. डोळे उघडे ठेवले तरी ध्यानस्त आणि मिटले तरी ध्यानस्त. अजून काय पाहिजे. किल्ल्यावर आणि पोटाशीही लेणी आहेत. नवव्या शतकात त्यांची निर्मिती झाली असे माणले जाते. हा किल्ला मुघलांच्या आणि शिवरायांच्याही साम्राज्यात होता.
भोरगिरी गाव मोठं वैशिष्ट्यपुर्ण आहे. खेड तालुक्याचं पश्चिम टोकाचं हे अखेरचं गाव. या ठिकाणी 33 कोटी देवांची भिमासुराला मारण्याबाबतची बैठक झाली. त्यात शिवशंकराने ही जबाबदारी स्वतःकडे घेतली आणि आत्ता जेथे भिमाशंकराचे मंदीर आहे तेथे त्याला मारला. 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे एक पवित्र ठिकाण. पण त्याचे दर्शन सत्कारणी लागायचे असेल तर त्याआधी भोरगिरी गावातील शंकराच्या मुख्य मंदीरात येवून दर्शन घ्यावे लागते आणि मग भिमाशंकराचे दर्शन घ्यावे लागते, असे पुराणात लिहीलंय असं इथले समाजबंधू सांगतात. या मार्गे पायी भिमाशंकरला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.













No comments:
Post a Comment