Sunday, November 1, 2015

सुधागडची माणसं

दम खावा जरा दम खावा. असा सुचना वजा आदेश देत कृष्णानं गवळणी आडवाव्यात तसं सुधागडच्या उतरणीला रामा बर्गे नं आम्हाला आडवलं. मावशीचा रोल भिकाजी दादा व माझ्याकडे आलटून पालटून...
गडी आमच्या कानुशानं पिठाचं बोचकं भर वाटंत ठेवून बाजूच्या दगडावर मामलेदारासारखा पायावर पाय व हातावर दाभाड टाकून बसलेला. आम्ही टेकायच्या आतच त्याची गण-गवळण सुरू झाली.
मी १५ वर्षे गडावर राहतो. मंदीरांची देखभाल ठेवतो.... खोटं कशाला बोलायचं ?
गडाखालून पिठ घेवून वर चाललोय. पोटाला खायला कायतरी लागतं... खोटं कशाला बोलायचं ?
पण आता दसऱ्याला गुरव येईल, सगळं डंबुलम घेवून जाईल... खोटं कशाला बोलायचं ?
दसऱ्याच्या टायमाला वाघाची यक तरी फेरी नक्की व्हईल, यक तरी गुरं वासरु नक्की मारील... खोटं कशाला बोलायचं ?
म्हतारी भेटली का तुमाला गडावं, तिची लय कमाई हे... खोटं कशाला बोलायचं ?
मला दुसरी कायच कमाई नायी. तुमच्या सारख्यांनी काही दिलं तर घ्यायाचं... खोटं कशाला बोलायचं ?
असं दर एक वाक्याच्या शेवटी खोटं कशाला बोलायचं ? असं प्रश्नार्थी उत्तरानं स्वतःचं जस्टिफिकेशन देत कृष्ण... सॉरी... रामा आमच्याकडं पैसे मागत होता. बाकी सगळं राहीलं बाजूला त्यानं त्याचं पेटंटेड स्पेशल हेलातलं जस्टिफिकेशन दिलं की हसू हसू मरायची वेळ.
एकीकडे हा असा कल्लोळाचा गडी. तर दुसरीकडे गडावरील सिद आज्जी म्हणजे साक्षात कारुण्याची देवी. भिकाजी दादा म्हणालेही... देवी, अप्सरा म्हताऱ्या झाल्यावर अशाच दिसत असतील का रे ? (म्हणजे दुसरा मँटर बिटविन दी लाईन अर्थ... तरूणपणी ही कित्ती कित्ती कित्ती सुंदर असेल ना रे wink emoticon
गड माथ्यावर दोन घरं आहेत. तिथं सिद म्हतारी म्हतारा राहतात. हा त्यांचा गडावरचा सच्चा शेजारी राहतो. आज्जी गडावर आलेल्यांना चहा पाणी, नाष्ता, जेवण देवुन अर्थार्जण करते. अतिशय लाघवी. गुचक्या देत बोलते पण एकेकशब्द जणू काही मोत्यात गाठलेला. कमालीची शांत, तृप्त. ती तृप्तता तिच्या वागण्या बोलण्यातून झळकते. चांदीच्या बाळ्यांच्या भारानं ओघळलेले कान, पायी पैजण, इतर अलंकार, आभुषणे आणि सुरकुत्याही कित्येक दशकांच्या तृप्त जिण्याची कथा सांगणाऱ्या...
परिस्थिती माणसाला घडवते आणि माणूस परिस्थितीला. दोघेही एकमेकांवर आपापली छाप सोडतात. त्यातून दोघांचेही स्वभाव तयार होतात. निसर्ग त्याला झालरी लावतो. मग कुणाचा हात देता होतो कुणाचा घेता. माणूस म्हणून हाती घेतले तर हे दोन्ही हात कमालीचं सौख्य देतात. एनरिच करतात.
सुधागडच्या व्हर्जिन वाऱ्यात फोफावलेल्या, अशा सर्व प्रकारच्या खोडींनी, गुणांनी भरलेल्या अप्रतिम माणसांना सलाम.



No comments:

Post a Comment