शेवटी साडेबाराच्या दरम्यान सुनिल तांबे सर आणि रमेश जाधव वाड्यावर. भरगच्च अपेक्षित असलेल्या गाडीत इन मीन तीन माणसं आणि नवीन प्रश्नचिन्ह. जायचं कुठं ? सोलापूर-उस्मानाबादचा प्लॅन कधीच गुंडाळला गेलो होता. संतोष, आता तु सांग कुठे जायचे... जास्त ताण नको, निवांत जावू जेवू बिवू आणि उद्या संध्याकाळी पुण्यात... इति तांबे सर. मी आपले पुण्यापासून दाही दिशांना फुटणारे रस्ते डोक्यात धुंडाळायला सुरवात केली. रमेशने पुण्यापासून हाकेच्या डेस्टीनेशन्सवर असलेल्या ठिकाणांचे पुस्तक काढले. शेवटी चहाचे कप रिचवता रिचवता दापोली-हर्णे वर शिक्कामोर्तब झाले.
जाता जाता वाटेत मुळशी धरणाजवळ कुठल्याश्या हॉटेलमध्ये पोटपुजा करुन घेतली. रात्री दापोलीत. मुख्य पेठेतला एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये (सॉरी, आता नाव नाही आठवत, पण अमित गद्रेंनी शिफारस केली होती.) जेवलो. तेथून थेट साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक गाठले. तास भर संपूर्ण स्मारक फिरुन पाहीले. दापोली कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये मुक्कामी पोचलो. गेस्ट हाऊस फुल्ल होते. कुलगुरु डॉ. किसनराव लवांडे सरांनी खास एक खोली मोकळी करुन दिली. (त्याबद्दल त्यांचे विशेष आभार) आणि रात्री पथारी पसरायची सोय झाली.
रमेश आणि माझा अॅग्रीकॉस किडा एव्हाणा वळवळायला लागला. तांबे सरांना रुममध्ये सोडून बाहेर पडतो. रात्रीच्या अंधारात कानोसा आणि कवडश्याने दापोलीचे गल्लीबोळ फिरायला लागलो. साली ही कोकणातली शहरं वेगळीच असतात. तसं दापोली मला नवीन नाही. कित्येक उन्हाळे, पावसाळे दापोलीत काढलेत. पण इथली प्रत्येक रात्र वेगळीच कथा सांगते. चार जानेवारीच्या रात्रीचीही कथा वेगळीच होती.
स्टॅंडला वळसा घालून रमेश आणि मी परत फिरलो आणि येथिल रिक्शा चालक मालक संघटनेने आयोजित केलेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय महिला कब्बडी स्पर्धेच्या चारीमुखी तुडुंब भरलेल्या मैदानाच्या सिमारेषेवर बसकण मारली ती थेट रात्री साडेअकरा, पावणेबारापर्य़ंत. काय जब्बरदस्त टॅलंट आहे कोकणाच्या कानाकोपर्यात. गावोगाव मुलींचे कब्बडी संघ आहेत आणि खेळतातही अप्रतिम. दोन तास कसे गेले समजलं नाही... स्पर्धा चालू राहीली पण आम्ही आवरतं घेतलं.
दुसर्या दिवशी सकाळीच उठलो, आंघुळ्या पांघुळ्या उरकल्या आणि दिवस उगायच्या अर्धा तास आधिच हर्णे बंदर गाठले...

न्हालेल्या जनू सौंदर्यवतीच्या मोहक स्वज्वळतेने बंदर... असे मी म्हणणार
नाही. पण इथली रौनक काही निराळीच आहे... याची देहा याची डोळा
अनुभवल्याशिवाय त्याची खारी जिन्नस मेंदूत भिनत नाही. समुद्रावरुन येणारा
खारा वारा... त्या वार्यावर रात्रभर खोल समु्द्रात मासेमारी करुन आलेला
खारावलेला कोकणचा राजा आणि मग होडीतून बैलगाडीत आणि बैलगाडीतून किनार्यावर
सांडलेली या राजाची सागरी दौलत. खुला लिलाव.
पुण्यातल्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये जसा खुला लिलाव (होलसेल) आणि
त्याच्याच जवळ किरकोळ विक्री (रिटेल) चालते तसाच प्रकार इथे आहे. आणि
दरातला फरकही तसाच. एका बाजूला खुल्या लिलावात माशांची पाटी हजार दोन हजार
रुपयांना मिळते आणि ती पाटी दहा पंधरा फुटावर बायका विकायला बसून दुप्पट
रेट लावतात. आम्ही किरकोळला डोकं लावण्यापेक्षा होलसेलमध्ये वजन टाकायचं
ठरवलं आणि तांबे सरांनी बोली लावायला सुरवात केली...
रमेशने पण म्हावरा चापसून पायची संधी सोडली नाय...
आम्ही तर काय बोलायची सोयच नाय... एकदम खल्लास... पापलेट जाम आवडला आपल्याला पण खान्यासाठी यंदा जरा वेगळा सुरवात करायचा म्हणून तांबे सरांच्या पसंतीने आणि पाकिटाने हलक्याची निवड केली. चार हलव्यांची पाटी 1600 की 1800 ला विकत घेतली. याशिवाय आमच्या मत्स्यप्रेमी आणि लवकरच शेततळ्यातील मत्स्य उत्पादक शेतकरी होऊ घातलेल्या ड्रायवरने ऑक्टोपसवर्गिय वेगळ्याच माशांची पाटी घेतली. ट्राय करुन पाहतो म्हटला...
माशांची पाटी घेतली आणि तांबे सर पेटले. आपण जंगलात मासे करुन खायचे, फर्माण सुटले आणि आम्ही कामाला लागलो. गाडीत माशांच्या दोन पाट्या. प्लॅस्टिकच्या पिशवीत फुकटचा बर्फ टाकून मासे ठेवलेले पण त्यांचा वास गाडीत घुमू लागलेला.
दरम्यान, हर्णेतून बाहेर पडून किनार्याला फेटफटका मारताना रस्त्याच्या कडेला माशांच्या मोठ्या पाड्या मांडून बसलेल्या एका कोळीनीच्या पाटीला आमच्या गाडीच्या पुढच्या चाकाचा थोडा धक्का लागला आणि बाई बोंबलायला लागली... ओ माजा मासा चिंगरलाव... मासा चिंगरलाव.... झाली बोंब. तेवढ्या एक कोकणी हिरोही तीला साथ द्यायला आला... चहा पैसे काढा, मास्यांचं लय नुकसान झालाव. तांबे सरांनी होय ना होय ना करता करता गाडी पुढे काढायला लावली. त्यात बाकीच्या बायांनीही जावू द्या जावू द्या म्हणत आमची सुटका केली... अर्थात ती म्हावरीन नसतीच ऐकली तर तांबे सरांकडे उतारा होताच.. तुझे जेवढे मासे चिंगारलेत तेवढे आमच्या मास्यांमधून आदला बदली करुन घे, हिशेब चुकता... पण ती वेळ आली नाही...
मग दापोलीच्या मुख्य बाजारपेठेत आम्ही तिघे संसार विकत घेण्याच्या मार्गावर. तवा, उलथणे, आचार्यांना बसायला स्ट्रूल, तेल, मिठ, मिरची, हळद, कसले कसले मसाले, सुरी, कांदापात, कोथंबीर, टोमॅटो, शेंगदाने, डिश, ग्लास आणि भरपूर काय काय सामान गोळा केलं पिशव्या भरल्या आणि गाडीला स्ट्रार्टर मारला.
शेवटी महाडच्या मागे वीस तीस किलोमिटर अंतरावर नदीकाठी एका मोठ्या वडाच्या
झाडाखाली आम्हाला हे रेडीमेड चुल्हांगान सापडलं आणि आमची चुल पेटली. सरपणाबरोबर बोंबलाचे पुडके चुलीत सरकले. पहिला ताव बोंबलांचा. तांबे
सर मुख्य आचारी, ड्रायवर त्यांचा मदतनीस आणि मी व रमेश लाकुडफोडे व
वकुबानुसार इतर कामे जसं की चुल पेटवा, जाळ घाला, मासे मुरवायला मदत करा,
तांबे सरांनी माशांचा घाणा काढला की पुढचा घाणा होण्याआधी आधिचा घाणा फस्त
करा... इत्यादी.
तांबे सर अप्रतिम मासे बनवतात, याचा साक्षात्कार अनुभवला. माझ्या आत्तापर्यंतच्या 30 वर्षाच्या आयुष्यात कोकणात राहून आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक धरणांची काठ तुडवूनही एवढी अप्रतिम चव कधी जिभेवर रेंगाळली नव्हती. मासे मसळवल्यानंतर काही विशिष्ट वेळ ते मसाल्यात मुरु देण्याची आणि ते मुरल्यानंतर त्यांना फ्राय करण्याची त्यांची टेक्नॉलॉजी अद्वितीय. पाटीभर (म्हणजे तीन) मासे दणकावून पुण्याच्या दिशेने कुच गेले आणि संध्याकाळी मत्स्यांच्या वासाने लडबडलेला मी स्वगृही शॉवरखाली.
ता. क. - दोन दिवस, धम्माल मजा... शब्दांना मर्य़ादा आहेत, अमर्याद भावना त्यात कशा जखडायच्या. वर फक्त रुपरेषा उमटली आहे. तांबे सरांनी गेल्या काही दशकात कमावलेला अनुभव आमच्या मडक्यांमध्ये हलव्याच्या फ्लेवरसह काही अंशी रिता झाला, हा या खेपेचा विशेष बोनस.





