Sunday, November 1, 2015

घनगडची मावशी


शेतकऱ्याच्या दारातून कधी कुणी मोकळ्या हातानं, रिकाम्या पोटानं परत जात नाही. दुर्गम भागात फिरताना हे नेहमी अनुभवतो. परवा मुळशीच्या बँकवॉटरला सह्याद्रीच्या माथ्यावर अचानक घनगडला गेलो. दुपारच्या पहारी जँम भूक लागली. शिधा तर सुधागड वरच संपलेला. मग नेहमीप्रमाणे स्थानिक शेतकऱ्याच्या घरी जेवण हाच पर्याय.
भांबुर्डेच्या टेपेवाडीत पहिलंच घर लागलं. मावशी वट्यावं काहीतरी करत होत्या. म्हटलं जेवण बनवून देता का वो ? लय भुक लागलीये. क्षणाचाही विलंब न लावता मावशी म्हणाल्या २-३ भाकरी हायेत आता टोपल्यात. तेवढ्या खावून घ्या. तुम्ही फिरून येतात तव्हर सैपाक करते.
तांदुळ ज्वारीची मिक्स भाकरी, लसणाची चटणी, आंब्याचं लोणचं ताव मारला. घनगडाचा टापू फिरून आलो तर स्वयंपाक तयार होता. बटाटा हरभऱ्याची शाख, तांदुळ ज्वारीची गरमागरम भाकरी, इंद्रायनी व लोकल व्हरायटींचा मिक्स भात... ए वन. नवरा बायकोनं अतिशय आग्रहानं खावू घातलं.
आम्हा पाच जणांच्या गृपमधला लहानगा रूषीकेश भात खायला नको म्हणाला. मावशी म्हणाली... बाळा फक्त एक घास घावून बघ. बाळानं आज्जीचं ऐकलं. एक घास खाल्ला आणि एवढा खूश झाला की बस्स. गडी नुसता वरण भातच खात सुटला. पाच जणांचं भरपेट जेवण, नाष्ता सारं काही टोटल बिल फक्त ३५० रूपये.
अविड चवीचं, सकस, गावरान अन्न आणि जोडीला मावशीनं त्यात ओतलेली माया, जिव्हाळा, प्रेम... त्यात काकाचा आग्रह. माया एवढी की निघताना मावशीनं रूषीचा मस्त मुका बिका घेवुन त्याला गावरान काकड्यांचा मेवाही दिला. जणू आम्ही त्यांच्या रक्ताचे जिवाभावाचे आहोत... ही अशी माणसं भेटली की जगण्यावर शतदा प्रेम करावंस वाटतं. त्यांच्या सहवासानं आपलंच जगणं समृद्ध होतं.
काकाचं नाव दत्ता कुंभार, मावशीचं सौ. सुनंदा दत्ता कुंभार. बिनभरवशाच्या शेतीत त्यांचा झगडा सुरू आहे. भात ऐके भात. जोडधंदाचं थिगळ लावायचं काम चाललंय. काका टेलरिंगचं मशिनकाम करतात, पिठाची गिरण चालवतात, मशागतीसाठी ट्रँक्टरचीही सेवा पुरवतात एवढं सगळं करूनही परिसरात लोकसंख्या विरळ असल्याने उत्पन्न तुटपुंजच. तशातही मुलामुलींना शिकवताहेत, एक मुलगा शिक्षक झालाय, दुसरा पुण्यात इंजिनिअरिंग करतोय. कुटूंब लढतंय.
- जमिन खरेदी विक्री तेजीत
मुळशी धरणाच्या बँकवॉटरला जमीनीची खरेदी विक्री गेल्या काही वर्षात मोठे व्यवहार झालेत. एकेका कंपनीने हजार हजार एकर-हेक्टर जमिन खरेदि केलीये. पण आता इको सेन्सिटीव झोनचं काय होतंय यावर या जमिनी झुलत आहेत. इको सेन्सिटिव्ह होवू नये, बंधने येवू नयेत म्हणून कंपन्यांचे प्रयत्न सुरू आहेत. लवासातील २०० एकर जमीन कातकऱ्यांना परत करायचा आदेश कोर्टाने दिल्याने या भागातील लोकांना आशेचा किरण दिसतो आहे. जुळवाजुळव सुरू आहे. जमिनीचे एजंट सक्रीय आहेत. २५-३९ लाख रूपये एकर आडबाजूचा रेट आहे.
- आहाराचं नवं मिश्रण
कोणत्याही प्रकारचं सुखवस्तु जिवन नसतानाही पश्चिम घाटाच्या दोन्ही बाजूला मधूमेह फैलावत आहे. भाताचं अधिक्य असलेला आहार हे याचं मुख्य कारणं असं लोक सांगतात. यावर उपाय म्हणून इंद्रायणीसारख्या एकाच वाणाचा भात खाण्यापेक्षा त्यात जुन्या गावरान भात मिक्स करणे, फक्त तांदळाची भाकरी खाण्यापेक्षा भात व ज्वारी समप्रमाणात मिक्स करून त्याची भाकरी करणे असे विविध बदल आहारशैलीत होत आहेत.






No comments:

Post a Comment