शनिवार व रविवार (14,15 डिसेंबर) - संजय झिंजाड, नितिन ढमढेके, अतुल पानसरे, बाळासाहेब कावळे, अशोक डुकरे, संतोष डुकरे, हनमंत पाटील व संदीप पाटील.
सायंकाळी 6.30 - पुण्यातून सकाळनगरमधून प्रवास सुरु.
रात्री 7,00 - भाम, हॉटेल रिव्हर टी हाऊस, सर्वांची गाठभेट, ओळखपरेड, भेळभत्ता व चहापाणी
रात्री 8.30 - ओतूर, नितिनभाऊ ढमढेरे यांच्या घरी हजेरी. रुद्रच्या बाललिलांचे अविष्कार.
रात्री 9.30 - दोन्ही कार नितिनच्या घरी ठेवून, स्पेशल ओम्नी मधून 8 जण खिरेश्वरच्या दिशेने.
रात्री 10.00 - हॉटेल माळशेज एक्झुक्युटिव्ह मध्ये जेवण.
रात्री 11 - खिरेश्वरच्या दिशेने प्रयाण
रात्री 1.15 - हरिश्चंद्रगडाकडे पायपीट सुरु.
पहाटे 5.15 - गडावर
सकाळी 10.30 - कोकण कड्यावरुन परतीचा प्रवास सुरु
दुपारी 3 - पिंपळगाव जोगा धरणात डुबक्या
दुपारी 4.30 - ओतूर - हॉटेल माळशेज एक्झुक्युटिव्ह
सायंकाळी 6 - नितिनभाऊंच्या घरी
रात्री 9.30 - पुण्यात स्वगृही.
रात्री ओतूरमध्ये मुक्काम आणि रविवारी पहाटेच हरिश्चंद्रगडकडे प्रयाण असा कार्यक्रम सुरवातीला ठरला होता. पण ओतूरला नितिनच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या आईने रात्रीच गेलात तर चांगलं होईल असं सुचवलं आणि संपूर्ण प्लॅन चेंज झाला. दिवसाचा ट्रेक रात्रीचा झाला. बरं रात्रीच्या ट्रेकची कुणाचीच काहीच तयारी नाही. ना बॅटरी, ना काठी, ना प्रथमोपचाराचे साहित्य. फक्त जिगर आणि मस्ती. नितिनच्या आईंनी एक बॅटरी आणि एक चादर दिली. ट्रेक सुरु. नितिनला कशा परिस्थितीतून उचलला तो आणखी वेगळा किस्सा...

हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर लक्षात आलं की गडावर पहाटे चहा मिळाला नाही तर... मग इथूनच चहा घेऊन जायचं. थर्मास म्हणजे काय हे 10 मिनीटे प्रयत्न करुन हॉटेलवाल्याला समजून सांगितल्यानंतर 300 रुपये डिपॉझिट देवून चहा घेतला व रात्री 11 च्या सुमारास खिरेश्वरकडे कुच केले. रात्री 1.15 वाजता खिरेश्वर गाठले आणि ट्रेकिंगचे पहिले पाऊल टाकले.

ट्रेकला सुरवात करतानाच पहिल्यांदा चहाचे प्याले घशात उपडे झाले. त्या जोरावर पहीला टप्पा वेगात पार झाला. थांबलो ते ही डाब्या बाजूला विशाल उंच कड्याच्या सावलीला. सावलीही अशी की चंद्र झाकोळलेला. सावलीतून बाहेर पडताना चंद्र आणि डोंगरात चाललेला सावलीचा खेळ अप्रतिम. निम्मा डोंगर झाकोळलेला आणि निम्मा चंद्राच्या प्रकाशात उजळून निघालेला... सकाळी सकाळी सुर्याची किरणे ज्या तेजाने झेपावतात त्याच तिव्रतेच्या शितलतेने सात्विकतेने झेपावणारी अगणित चंद्रकिरण, रविकिरण... नजर लागली असवी त्या चंद्राला अन् किरणांना संजयची आणि माझी कारण पुढचे दोन तीन टप्पे आम्हाला दाट जंगलातून रातकिड्यांची किरकिर कानात कुरुपासारखी रुतून घेत पार पाडावी लागली... भयाण शांतता आणि त्यात आमच्या ललकारी...
पायाखालून सरकणारे दगड आणि दगडावरुन हेलकवणारी आमची देहाची लक्तरं सावरंत सावरंत दुसरा टप्पा गाठला तो एका कड्याच्या थोड्या सपाट कातळ पोटाचा. पाठ टेकल्याबरोबर हनमंतराव घोरण्यासाठी सुर सापडू लागले... बाबासाहेब कावळे आणि अशोकला पुढच्या टप्प्याचे वेध लागलेले तर बाकी आम्ही हातपाय पसरलेले... वाट चुकलो की काय चुकलो की काय ही मनातील शंकेची पाल चुकचुकवित वाट सरत राहीली... खिंड गाठली.
खिंडीपासून पुढची वाट तशी सरळधोपट पण उरफाटी होती. रात्रीची भयाण शांतता त्यात एका बाजूला डोंगरकड्याची वाढती उंची आणि दुसरीकडे खोल खोल होत चाललेली दरी. कधी पाठ तर कधी हात टेकत अंतर कापत होतं. एकमेकाला प्रोत्साहन. मध्येच शिवाजी महाराजांचा जयजयकार तर कधी जुन्या मराठी गाण्यांच्या लकेरी... पायातलं बळ उत्तरोत्तर वाढत गेलं... आणि पहाटे 4 दरम्यान गडावरचा पहिला टप्पा गाठला. शनिवारी सायंकाळीच गडावर पोचलेला पुण्यातील एक गृप तेथे शेकोटीवर पहारा देत होता. पाच की सव्वापाच च्या दरम्यान हरिश्चंद्रगडाच्या अलिकडील सर्वात उंच टप्प्यावरील खोपटापाशी पोचलो. 10-15 मिनिटे खल होऊन या ठिकाणी 2 तास झोपायचे ठरले. एक चादर आणि एक ब्लॅंकेट सोडलं तर कुणाकडेच काही अंथरुन पांघरुन नव्हते... थंडी प्रचंड आहे हे झोपायला पाठ टेकवल्यावर जाणवलं.
शेवटी शेअरिंगमध्येच सगळेच कुडकुडायला लागले. अखेर संजय आणि नितिनं माचिस काढले सासूबाई गोळा केल्या आणि शेकोटी पेटली. हळू हळू एक एक जण अंथरुणावर चुळबूळ करुन शेकोटीभोवती गोळा झाला. (अपवाद हनमंत पाटील - हा माणूस झोपेच्या बाबतीत अफलातून आहे, ऊन नाही वारा नाही थंडी नाही गारठा नाही अंथरुण नाही पांघरुन नाही काही पाहणार नाही टेकली पाठ की झोपला.) खोपटीच्या काटक्या उत्तरोत्तर कमी कमी होत गेल्या, आजूबाजू्च्या काड्याकपट्या कामी आल्या आणि संजयच्या कॅमेर्याने निखार्यांमधील धुमारे टिपायला सुरवात केली. संजयमधील कॅमेरामन पेटून उठला आणि महाराष्ट्राला दोन यंग डायनॅमिक मॉडेल संजयच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.
एव्हाना एका रात्रीत पडत्या चांदण्या मोजण्याचा आमचा विक्रम झाला, तब्बल 58 चांदण्या पडताना पाहिल्या त्याही चालून चालून दमल्यावर थोडी विश्रांती घ्यायला थांबायचो तेवढ्या वेळात. आमची पाठीमागे आमच्यावर कितींनी जिव ओवाळून टाकला असेल गणती नाही. दरम्यान निसर्ग आपले एक एक ठेवणीतले रुप दाखवू लागला.
आत्तापर्यंत रात्रभर शांत असलेला वारा पुर्वकडून खोल खोल दरीवरुन गार झुळका घेवून आमच्या बोकांडी आदळू लागला.. तांबडं फुटायची चाहूल लागली.
त्यानंतर अर्धा तास संजयची हौस भागवणारा होता. नाना कल्पना, शटर स्पीड आणि कसली कसली 50 हजारावरुन 200-250 पर्यंत आकडेमोड करणारी लाईट व इतर इफेक्टची गणितं... त्याला नितिन आणि अतुलभाऊंच्या मिष्किल कॉमेंट्सचा तडका, लाजवाब. इथंली ही सर्व छायाचित्रे संजयच्याच कलाकुसरीतून अवतरली आहेत.
जसजसं तांबडं फुटत गेलं तसतसा पोट्ट्यांचा हुरुप आणखी वाढत गेला. शनिवारी दिवसभर आपापल्या कामाचा प्रचंड ताण, त्यानंतर संध्याकाळी ट्रेकची वेळ साधण्यासाठी केलेली प्रचंड धडपड, प्रत्यक्ष ट्रेकिंग सुरु कऱण्यापर्यंतचा फस्ट गिअर वरचा प्रवास आणि त्यानंतर चार तासांची दमदार पायपीट... स्वतःच्याच शारिरिक क्षमतेची नव्याने जाणिव करुन देणारी. त्यात आता या कड्यावरील मंद झुळूक, तितक्यात मंदपणे धगधगनारी शेकोटी, सोबतीला जिवाभावाचे मित्र आणि पुर्वक्षितीजावर सुरु असलेला नारायणाचा नट्टापट्टा, त्याचं लाजणं मुरडणं... क्या बात है. अवर्णनिय.
तांबडं फुटणं किती पराकोटीचं नशिलं असू शकतं याची कल्पना, अनुभव हरिश्चंद्रगडाशिवाय इतरत्र दुर्मिळच. पुढे तांबडं हवेत विरुन सुर्याचा खरा चेहरा बाहेर आला. आम्हालाही प्रातविधीचे वेध लागले. ते उरकून पुन्हा एकदा शेकोटीशी फेर धरला. तापवण झाली. आणि मग सकाळी साडेसात आठ वाजण्याच्या सुमारास हुडहुडत्या अंगाने जुने जाणत्या जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अंतिम धेय्याकडे मोठ्या दिमाखात वाटचाल सुरु झाली.
आता चढण कमी आणि उतरण जास्त होती. मजल दरमजल करत तास दीड तासाच्या चालण्यानंतर आम्ही मंदाराजवळ पोचलो. इथे आठ दहा गृप रात्रभर मुक्काम करुन हरिचंद्रगड दर्शन आणि पोटपुजा करण्यात मग्न होते. दर्शनाआधी रिकामे पोट भरुन घेण्याच्या विचाराने आम्ही मंदीरापासून कासराभर अंतरावर खडकावर बसलो... ऑडर सुटल्या... पोहे, चहा. तोपर्यंत पाठीवरच्या बॅगमधील पुरचुंड्या रित्या झाल्या. खारे शेंगदाने, फुटाणे, शेव, फरसान, भडंग, थालिपीट, भुईमुगाच्या खारवलेल्या शेंगा, भामची भेळ दे दणादण... त्यावर 25 रुपये प्लेटचे विकतचे पोहे आणि 10 रुपये कप चा चहा म्हणजे कमवलंच. पोटपुजा झाल्यानंतर महादेवाच्या मंदीरात जावून दर्शन घेतले. इथलं मंदीर अफलातून आहे. बाजूच्या उत्तूंग तारामती बालेकिल्ल्यावरुन पाण्याचा एक मोठा लोट वाहत येतो. या लोटाच्या बरोबर मध्यभागी हे मंदीर आहे. पावसाळ्यात मंदीराच्या चारही बाजूंनी पाणी वाहत असते हे पाणी वाहून जाण्यासाठी मंदीर बांधताना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रचना करण्यात आली आहे.
आसपासची पाण्याची टाकी, गुफा आणि मंदीर यांचा एकत्रित विचार केला तर पुरातन वास्तुशास्त्राचा अफलातून नमुना आहे. इथले मंदीर भारतीय पुरातत्व खात्याने संरक्षित वास्तु म्हणून घोषित किंवा संरक्षित केलेले आहे. त्यावरचे दगडी कोरिव काम आता नैसर्गिकरित्याच बोथट, सौम्य झाले आहे. मात्र त्यावरुनही या मंदीराच्या गतवैभवाची कल्पना येते.
या ठिकाणाहून पुढे हरिश्चंद्रगडाचे मुख्य आकर्षण आणि शान असलेल्या कोकण कड्याकडे वाटचाल सुरु होते. अर्धा तास दमछान होते पण ट्रेकचे सार्थक होते. एका सदाशिव पेठी निनावी पुणेकर ट्रेकरने दमून भागून मध्य अंग टाकलेल्या नितीनभाऊ ढमढेरेंना... कोकणकडा नाही पाहिला म्हणजे पंढरपूरला जावूनही विठ्ठलाचे दर्शन न घेतल्यासारखे आहे. या एकाच वाक्याने पळत जावून कडा पहायला लावला.. कडा पाहून, फोटोसेशन करुन झाल्यावर सकाळी 10.30 वाजता आमचा परतीचा प्रवास सुरु झाला.
रात्री जाताना चांदण्या आणि चंद्राच्या प्रकाशात आम्ही कसे गेलो त्याचे गांभिर्य भारसे जाणवले नाही. मात्र रात्री तुडवलेली वाट सकाळी पाहताना मात्र जड झालं. अर्थात उतारानं परतीचा वेग अधिक होता मात्र अनेक ठिकाणी जिव दोन्ही हाताच्या दहा बोटांनी खडकावरुन रुतुन उतरावं लागतं होतं. ही या ट्रेकची वेगळीच मजा आहे... रात्रीचा अनुभव व दिवसाचा परस्परांशी अतिशय भिन्न प्रकारे भिननारा असतो. जसजसं उतरु लागलो तसतसं पिंपळगाव जोगा धरण पुन्हा एकदा नजरेच्या टप्प्यात येवू लागलं आणि मग अचानक प्लॅन ठरला... ट्रेकचा सगळा शिनवटा पिंपळगाव जोग्याला अर्पण करायचा... धरणात पोहायचं.
नितिन प्रचंड दमलेला असतानाही सर्वांना सहन करत, साथ देत गाडी धरणाच्या
बाजूला भर उन्हात पार्क केली आणी आम्हा पाणकोंबड्यांना धरणात सोडलं. अर्धा
पाऊण तास येथेच्छ डुबून ताजेतवाणे होवून पुन्हा हॉटेल माळशेज एक्झुक्युटीव
च्या दिशेने प्रयाण केले. दुपारी 4 च्या सुमारास हॉटेल गाठले. जेवलो.
त्यानंतर टापोटाप नितिन भाऊंचं घर गाठलं संजूनं गाडीला स्टारटर मारला आणि
पुण्याच्या दिशेने कुच. रात्री 9.30 वाजता नॉन स्टॉप पुण्यात घरपोच.या ट्रेकचे आयोजन आमचे जेष्ठ शिलेदार भिकाजी चव्हाण (टाटा मोटर्स) यांनी केले होते. मात्र त्यांना अचानक कंपनीच्या कामाचा व्याप येवून पडल्यानंतर संजय झिंजाडने चाणक्यनितीचा अतिशय कुशल वापर करत एकएक रायडर गोळा करुन मोट बांधली आणि हा नाईट ट्रेक यशस्वी केला त्याबद्दल या ट्रेकचा करता करविता आणि भरविता संजय झिंजाड याचे विशेष आभार.











अप्रतिम लिहिलेय संतोषराव......
ReplyDelete